मुंबई : प्रतिनिधी
वरळी येथे महायुतीच्या ‘आक्रोश मोर्चा’मुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना खरीखोटी सुनावली. या प्रकरणावरून एका सामान्य महिलेने भाजपला खरा आरसा दाखवला असून त्यांच्या फेक नॅरेटिव्हला चांगलीच चपराक दिल्याची टीका करत विरोधकांकडून भाजपवर थेट निशाणा साधण्यात आला आहे.
महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर न झाल्याने महायुतीच्या वतीने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांविरोधात २१ एप्रिल रोजी वरळीत जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, या मोर्चामुळे दुपारच्या सुमारास वरळी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दुपारी १ च्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक हैराण झाले होते. याच कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संताप अनावर झाला आणि तिने गिरीश महाजन यांना झापत, चालते व्हा! असा दम भरला.. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आता यावरून विरोधकांना भाजपवर टीका करण्याची संधी मिळाली आहे.
खरी नारी शक्ती : विजय वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर या महिलेचा व्हीडीओ शेअर करत भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, भाजपच्या महिला आघाडीला वाटले असेल की घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडले की महिलांचे प्रश्न सुटले! पण भाजपच्या कार्यकर्त्यांना काय माहीत, की खरी नारी शक्ती काय असते! त्यांच्या
घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा ‘इथून चालते व्हा’ हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला. इव्हेंटच्या कॅमे-यात शक्तिप्रदर्शन शूट होत असताना अचानक सामान्य मुंबईकर महिलेने भाजपला आरसा दाखवला.
भाजपला सत्तेतून हाकलून देतील : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपचा डाव ‘इंडिया’ आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावला आहे, असेही ते म्हणाले. आज फक्त मंत्री गिरीश महाजन यांना पळवून लावले आहे. येणा-या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
मंत्र्याला भररस्त्यात शिवीगाळ करण्याचा पहिलाच प्रसंग
– नाना पटोले
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना महिलेने केलेल्या कथित शिविगाळीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईतील महिलेचा संताप हा भाजपच्या सत्तेच्या माजाचा परिणाम आहे. आमची सत्ता आहे. या सत्तेचा ज्या पद्धतीने दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो, याचे सर्वांत मोठे उदाहरण काल फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांच्या दृष्टिकोनातून दिसून आला. सामान्य लोकांनी त्याला कसे ट्रोल केले. एक महिलाच त्यांना शिव्या घालत होती. महाराष्ट्रातील इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या.
भाजपचा मुखवटा टराटरा फाडतील;
रोहित पवारांची टीका
रोहित पवार ट्विट करत म्हणाले, नौटंकी करणा-या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडे करून ख-या अर्थाने ‘हजारोंसे भारी.. एक नारी’ हे सिद्ध केले! ही ‘नारी शक्ती’ ख-या अर्थाने ‘वंदनीय’ आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसे झाले तर सत्यासाठी भिडणा-या अशा शेकडो ‘नारी शक्ती’ पुढे येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटरा२२२ फाडतील..!, अशा शब्दांत पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

