नागपूर : प्रतिनिधी
केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाने आज आपल्या महाराष्ट्रातील नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीमध्ये अनेक नव्या चेह-यांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी यांनाही भाजपाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. अरुण लखानी यांची पक्षाच्या सहकोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेह-यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी टाकली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीत बढती दिली असून, यापुढे भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर अरुण लखानी यांची सहकोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही असून, सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि अरुण लखानी यांचा पुत्र सारंग लखानी यांचा विवाह निश्चित झाल्याची घोषणा हल्लीच झाली होती.

