सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जतना पक्षाचे राजेंद्र राऊत यांनी बाजी मारली आहे. राऊत यांना ४८३ मते पडली असून त्यांना आव्हान देणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांना ११८ मते मिळाली आहेत. राऊत यांनी ३६५ मतांनी विजय मिळविला आहे.
सोलापूर विधान परिषदेसाठी गुरुवारी (१८ जून) एकूण ६१६ मतदारांपैकी ६१४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. म्हणजेच ९९. ६८ टक्के मतदान झाले होते. भाजपच्या दोघांचे मतदान होऊ शकले नव्हते. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत सुरुवातील मतांच्या स्लीपांचे गठ्ठे बांधण्यात आले. त्यानंतर चार टेबलावर ही मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राजेंद्र राऊत हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीकडे असलेले संख्याबळ पाहता विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपची होती. मात्र, काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सूत्रे हाती घेत भाजपला आव्हान दिले होते. मात्र भाजपने विजय मिळवत बाजी मारली आहे.
सोलापुरात राजेंद्र राऊत आणि वसंत देशमुख अशी लढत असली तरी खरी प्रतिष्ठा पालकमंत्री गोरे आणि मोहिते पाटील यांची पणाला लागली होती. या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यासह भाजप नेत्याला संपूर्ण जिल्ह्यात दौरे काढायला भाग पाडले. बिनविरोधची अपेक्षा असलेल्या भाजपला पळायला लावले होते.
या निवडणुकीत अदृश्य शक्ती आमच्या सोबत असल्याचा दावा धैर्यशील मोहिते पाटील प्रत्येक पत्रकार परिषदेत करत होते. मात्र, ती अदृश्य शक्ती कामाला आली नसल्याचे दिसून येते.
















