लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने दि. ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. प्रत्येक घरावर तसेच सार्वजनिक संस्थांवर राष्ट्रध्वज फडकविण्यास प्रोत्साहन देणे, तिरंग्याशी नागरिकांचे भावनिक नाते अधिक दृढ करणे तसेच देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रनिर्मितीची भावना बळकट करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाच्या प्रभावो अंमलबजावणीसाठी पंचायती राज संस्थांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
हरघर तिरंगा अभियान कालावधीत आयोजित करण्यात येणा-या ग्रामसभांची सुरुवात, वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने करण्यात यावी. अभियानांतर्गत आयोजित सर्व प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्येही बंदे मातरमचे सामूहिक गायन तसेच राष्ट्रध्वज (तिरंगा) फडकविणे, प्रदर्शित करणे यांचा समावेश करण्यात यावा. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविला जाईल, यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करावा. पंचायत भवनावर राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा, तसेच पंचायती राज संस्थांमधील प्रत्येक लोकनियुक् प्रतिनिधीच्या निवासस्थानीही राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा. अभियान कालावधीत राष्ट्रध्वजाचे महत्व व सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी माहिती, शिक्षण व संवाद उपक्रम राबविण्यात यावेत.
















