लातूर : प्रतिनिधी
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर जिल्हयात रवाना केले होते. या पथकाने तीन ठिकाणी मटका, जुगार खेळणा-यांवर केलेल्या कारवायांत २७ आरोपींकडून ६९ हजार २८० रुपयांची रोकड, २० मोबाईल व साहित्य असा १७ लाख ८४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिरुपती हॉस्पीटलकडे जाणारे रोडवर राजे बार अॅन्ड रेस्टारंट समोर टीन शेडमध्ये मटका बुक्कीवर कारवाई करत १२ हजार ६१० रुपयांची रोकड व १९ हजार रुपयांचे ३ मोबाईल जप्त केले असून ६ आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवून, त्याचा तपास पोह निजामोद्दीन शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीत एमआयटी कॉलेज ते नवीन रेणापूर नाका येथे योगेश बनसोडे यांचे जागेतील पत्र्याचे शेडमध्ये कल्याण नावाच्या मटका बुक्कीवर कारवाई करत १९ हजार ३५० रुपयांची रोकड व ४२ हजार रुपयांचे ५ मोबाईल जप्त करत ९ आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवून, त्याचा तपास पोह सुनिल हराळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पथकाने अहमदपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनसोडे यांच्या शेतातील टीन शेडच्या बाजूस जुगार खेळणा-यांविरुद्ध कारवाई करत ३७ हजार ३२० रुपयांची रोकड, १२ मोबाईल, २ चारचाकी व ५ मोटार सायकली असा १६ लाख ९१ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १२ इसमांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द अहमदपुर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवून, त्याचा तपास पोउपनि श्रीमंगल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ गणेश राठोड, पोहेकॉ संदिप वाघाडे व पोहेकॉ गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
















