परभणी : शहरात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरूवार, दि. ३० जुलै रोजी सकाळपासून हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरातील श्री चिंतामणी महाराज मंदिर तसेच शिवाजी नगर परिसरातील किसान बेकरी परिसरात रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणा-या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
शहरात दरवर्षी पावसाळ्यात शिवाजी नगर व श्री चिंतामणी महाराज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभुमीवर श्री चिंतामणी महाराज मंदिर जवळ नाला काम करण्यात आले आहे. परंतू तरी देखील या ठिकाणी पाऊस होताच पाणी साचत आहे.
याशिवाय शिवाजी नगर परिसरातही पाणी साचण्याची समस्या जैसे थे कायम आहे. त्यामुळे पाऊस होताच या ठिकाणच्या रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्रा्प्त होत आहे. यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असून याकडे संबंधीत विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
















