सेलू : मागील जवळपास १५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज गुरूवार, दि. ३० जुलै रोजी सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात केली. सेलू शहर आणि ग्रामीण भागासह तालुक्यात सर्वदूर पाऊस हा पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून शेतकामांना वेग आला असल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मागील दोन ते तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. सुरूवातीच्या पावसावर पेरलेली बियाणे कोमेजून जाण्याच्या परिस्थितीत असताना गुरुवारी पहाटे पासूनच रिमझिम पावसाने सुरुवात केली. सेलू शहरासह ग्रामीण भागातही हा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पेरलेल्या पिकांना जीवदान मिळणार असून शेतकामांना वेग आलेला आहे. यापुढे किमान दोन दिवस असाच पाऊस कोसळत राहणार असल्याचा अंदाज असल्यामुळे शेतक-यांच्या अशा पल्लवीत झालेल्या आहेत.
जून महिन्यापासून पेरण्या केलेल्या पिकांना पावसाची निंतात आवश्यकता होती. मध्यतरी पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे कोमेजून जाण्याच्या परिस्थितीत असताना आजपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे जिवदान मिळाले आहे. मागील २४ तासात सेलू शहरात केवळ ७ मि. मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत १०१.५ मि. मी. पाऊस झालेला आहे. आजचा पाऊस तालुक्यात सर्व दूर सुरू आहे. हा पाऊस असाच सुरू राहील्यास धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होण्यास मदत होणार आहे.
















