लातूर : प्रतिनिधी
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव व बीड या चार जिल्ह्यांतील ६१ हजार २१६ कर्जखात्यांना एकूण ४६२ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला असल्याची माहिती सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली.
यामध्ये लातूर जिल्ह्यात २२ हजार ९६३ खात्यांना १५९.९५ कोटी, नांदेडमध्ये १२ हजार ९२९ खात्यांना १०६.२४ कोटी, धाराशिवमध्ये १२ हजार २१४ खात्यांना १०५.८६ कोटी तर बीड जिल्ह्यात १३ हजार ११० खात्यांना ९०.७४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. राज्यस्तरावर ६.२२ लाख शेतक-यांच्या खात्यात ५,०२८ कोटी रुपये थेट जमा झाले असून, मराठवाडा विभागात एकूण १ लाख ३० हजार ९३४ खात्यांना ९३२.६० कोटींचा लाभ वितरित झाला आहे. राज्यातील ५३ बँकांनी सुमारे ३२ लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी १६.९६ लाख शेतक-यांची पहिली यादी जाहीर झाली असून ६ ऑगस्ट अखेर १२.१० लाख खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र शेतक-यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यातही रक्कम जमा केली जाणार आहे. खरीप पीक कर्ज तातडीने वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचेही चव्हाण म्हणाले.
















