37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रदहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान भाग-१च्या प्रश्नासाठी मिळणार १ गुण

दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान भाग-१च्या प्रश्नासाठी मिळणार १ गुण

पुणे : इयत्ता दहावीच्या परीक्षेत विज्ञान भाग-एक या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत सर्वात लहान अणू कशाचा, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर काहींनी हेलियम तर काहींनी हायड्रोजन लिहिले आहे. दोन्ही उत्तरे बरोबर असल्याने यापैकी एक जरी उत्तर विद्यार्थ्यांनी लिहिले असल्यास त्याला एक गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

बोर्डाची बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली असून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इतिहास व भूगोल विषयाचे पेपर झालेले नाहीत. दरम्यान, यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने ब-याच उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे मागील परीक्षांच्या प्रमाणात या परीक्षेत कॉपी प्रकरणांत घट झाली आहे. आता परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु झाली आहे. सुरवातीला शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता, पण तो दूर करून आता उत्तरपत्रिकांची तपासणी सुरु झाली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार असून दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल असे बोर्डाचे नियोजन आहे. आता दहावीच्या विज्ञान भाग- एकच्या त्या प्रश्नाचे उत्तर हेलियमकिंवा हायड्रोजन यापैकी एक लिहिलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट एक गुण दिला जाणार आहे. मात्र, उत्तर न लिहिलेल्यांना गुण मिळणार नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

बोर्डाने घेतला निर्णय
इयत्ता दहावीच्या विज्ञान भाग-एकच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याची उत्तरे दोन प्रकारची असल्याचे निदर्शनास आले असून काहींनी दुसरे उत्तर लिहिले आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कोणतेही एक उत्तर लिहिलेले असल्यास त्या विद्यार्थ्यांना एक गुण मिळणार आहे. बोर्डाने तसा निर्णय घेतला आहे.

पुढच्या वर्षी ‘ओपन बुक’ पॅटर्नची शक्यता
सीबीएसई बोर्डाने बेस्ट ऑफ फाइव्हनंतर आता ‘ओपन बुक’ हा परीक्षेचा पॅटर्न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाने निकालासाठी बेस्ट ऑफ फाइव्हचा पॅटर्न स्वीकारल्यानंतर स्टेट बोर्डाने देखील तीच पद्धत अवलंबली. आता ओपन बुक पॅटर्न देखील स्टेट बोर्ड अवलंबू शकते, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्या पद्धतीत विद्यार्थ्यांना पुस्तक समोर ठेवून उत्तरे लिहिण्याची संधी मिळणार आहे, जेणेकरून कॉपी प्रकाराला कायमचा लगाम लागेल हा हेतू आहे. पण, पुस्तक समोर असले तरीदेखील विद्यार्थ्यांना स्वत:चा विचार करूनच उत्तरे लिहावी लागणार आहेत, अशी ही पद्धती असल्याचेही बोर्डातील सूत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR