25.9 C
Latur
Tuesday, June 17, 2025
Homeमहाराष्ट्रशनिशिंगणापूर मंदिरातून ११४ मुस्लिम कर्मचा-यांना हटवले

शनिशिंगणापूर मंदिरातून ११४ मुस्लिम कर्मचा-यांना हटवले

एकूण १६७ कर्मचा-यांना कामावरून काढले

शनिशिंगणापूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानने आपल्या १६७ कर्मचा-यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यात ११४ मुस्लिम कर्मचा-यांचा समावेश आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी नुकतीच या कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याचा इशारा दिला होता.

संपूर्ण महाराष्ट्रात विख्यात असणा-या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर मंदिरात ११४ मुस्लिम कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचा-यांनी गत २१ मे रोजी कथितपणे मंदिराच्या पवित्र चौथ-यावर जाऊन ग्रिल बसवले होते. तसेच तेथील स्वच्छता व रंगरंगोटीही केली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेत या कर्मचा-यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. तसेच या प्रकरणी १४ जून रोजी मंदिराबाहेर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता.

या इशा-यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने ट्रस्टमध्ये ११४ मुस्लिम कर्मचारी काम करतात हे मान्य केले, पण त्याचवेळी एकाही मुस्लिम कर्मचा-याची नियुक्ती मंदिराच्या मुख्य चौथ-यावर किंवा गर्भगृहात करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. हे कर्मचारी मुख्यत: शेती विभाग, कचरा व्यवस्थापन व शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत. ९९ कर्मचारी मागील ५ महिन्यांपासून नोकरीवर अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचाही पगार बंद करण्यात आला आहे. उर्वरित १५ कर्मचारी अनेक वर्षांपासून ट्रस्टला आपली सेवा देत आहेत. यातील काहींचा अनुभव २० वर्षांहून अधिकचा आहे, असे विश्वस्त मंडळाने म्हटले होते. पण या प्रकरणी देवस्थानवरील दबाव वाढल्यानंतर अखेर त्यांनी ११४ मुस्लिम कर्मचा-यांसह एकूण १६७ जणांना कामावरून कमी केले. या सर्वांवर अनियमितता व शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मंत्री राणेंंनीची होती मागणी
उल्लेखनीय बाब म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी गुरूवारीच हिंदू संघटनांनी मुस्लिम कर्मचा-यांच्या हकालपट्टीची केलेली मागणी योग्यच असल्याचे विधान केले होते. हिंदू संघटनांनी केलेली मागणी योग्यच आहे. हाजी अली आणि अजमेर दर्ग्यात कृत्य कुणी करेल का? असे कृत्य फक्त आपल्या हिंदू धार्मिक स्थळांसोबतच का केले जाते? कोणताही हिंदू व्यक्ती कोणत्याही मुस्लिम धार्मिक स्थळात काम करताना दिसला तर हे लोक त्याला नक्कीच सोडणार नाहीत. परंतु, ज्या प्रकारे आपल्या हिंदू धार्मिक स्थळांच्या प्रतिष्ठेशी सतत छेडछाड केली जात आहे, ते आपण आता कोणत्याही किंमतीत स्वीकारू शकत नाही. कोणत्याही मुस्लिम संस्थेत तुम्हाला कोणताही हिंदू काम करताना दिसणार नाही, असे ते म्हणाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR