पटेल, तटकरेंनी पत घालवली!
अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना खूप मानाचे स्थान होते. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नव्या पिढीच्या हातात पक्ष देताना नव्या दमाच्या नेत्यांवर पूर्णत: विश्वास टाकला होता. परंतु कायम भाजपच्या हातातील बाहुले बनणा-या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष आपल्या तालावर चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु शरद पवार यांची पक्षावर पकड असल्याने त्यांना वेगळी भूमिका घेता आली नाही. परंतु अजित पवार यांना नेहमीच कारवाईची भीती घालून सत्ताधा-यांच्या वळचणीला बसण्याचा आग्रह धरला आणि त्याचवेळी काका शरद पवार यांच्या विरोधात विष पेरून त्यांच्यापासून अजित पवार यांना वेगळे करण्याचे पाप केले. त्यानंतर ते सत्तेतही सहभागी झाले.
परंतु अलिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन होताच वेगळी चाल खेळत थेट राष्ट्रवादीवर ताबा मिळविण्याचा डाव टाकला. परंतु चाणाक्ष पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही चाल ओळखून त्यांचा डाव उलटवला. त्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडले. अजित पवार यांच्या पश्चात पक्षातील ज्येष्ठ आणि विश्वासू म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर सुनेत्रा पवार यांनी विश्वास टाकला. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार यांच्याशी सल्लामसलत करून निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करायला पाहिजे होता. परंतु पक्षाच्या अध्यक्षांनाच अंधारात ठेवून थेट कार्याध्यक्षांना निर्णय प्रक्रियेत स्थान आणि अधिकार मिळावा, अशी तरतूद करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र दिले गेले. जेणेकरून पक्षांतर्गत जो काही निर्णय होईल, त्याचा अधिकार थेट कार्याध्यक्षांना कसा मिळेल, याची तजविज पक्षाच्या संविधानात कशी होईल,
यादृष्टीने दिल्लीत हालचाली सुरू केल्या आणि थेट निवडणूक आयोगाला पत्रही दिले. याबाबत पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पूर्णत: अनभिज्ञ होत्या. परंतु प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा जो निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार झाला, ते पाहता सुनेत्रा पवार यांच्या मनात पाल चुकचुकली आणि त्यांनी पक्षाध्यक्ष या नात्याने अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ते आजपर्यंत जो निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार झाला, तो ग्रा धरू नये, असे पत्रच सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठविले. त्यामुळे कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा डाव उलटला गेला. यामुळे पक्षाध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचे अधिकार अबाधित राहिले आणि अजित पवार यांच्या पश्चात पक्षाची धुरा प्रामाणिकपणे सांभाळून पक्षाची ताकद वाढविण्याऐवजी पक्षावर ताबा मिळविण्याचा स्वार्थी आणि संकुचित दृष्टिकोन ठेवून जो काही कागदोपत्री धिंगाणा घातला, तो खरोखरच लांच्छनास्पद आणि पक्षनेत्यासाठी अशोभनीय आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या वर्षीच्या प्रारंभी २८ जानेवारी रोजी बारामतीला येत असताना विमान अपघातात निधन झाले. राज्यात दांडगा जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि तळागाळापर्यंत नाळ जोडलेला एकमेव नेता म्हणून अजित पवार यांची ओळख राहिलेली आहे. त्यांनी स्वत:च्या ताकदीवर पक्ष अतिशय ताकदीने चालविण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपासून अजित पवार यांनी पक्षात चांगलीच जान आणली होती. खरे म्हणजे महायुतीसोबत राहून सत्ता चालवताना पक्षीय संघटन मजबुतीच्या दृष्टीने अजित पवार यांनी नव्याने योजना आखणी केली खरी. परंतु पक्षविस्तारात सातत्याने विरोधकांपेक्षा मित्रपक्षांचेच अडथळे अधिक येऊ लागले. त्यामुळे राज्यात पक्षसंघटन वाढविण्याच्या दृष्टीने अजित पवार पावले टाकत असतानाच जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीत विमान अपघातात त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे राष्ट्रवादीची मजबूत फळी पोरकी झाली.
त्याचवेळी पक्षाची धुरा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्याचे ठरले आणि त्यानुसार प्रथम उपमुख्यमंत्रिपदाची शपथ आणि त्यानंतर त्यांची सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय कार्याध्यक्षपद कायम ठेवले.
तसेच सुनील तटकरेही प्रदेशाध्यक्षपदी कायम राहिले. त्यामुळे पक्ष मोठ्या धक्क्यातून सावरत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेईल, असे वाटत असतानाच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाचे सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीने १६ फेब्रुवारी रोजी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आणि त्यात पक्षांतर्गत निर्णयाचे अधिकार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षांना मिळावेत, या दृष्टीने पक्षाच्या संविधानात बदल करण्यास सांगितले. त्यामुळे निवडणूक आयोगदेखील पत्राची दखल घेऊन तयारीला लागल्याची सूत्रांची माहिती होती. पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांना याची कुणकुण लागताच त्यांनी सावध पवित्रा घेत ठोसपणे पावले उचलण्याचा निर्णय घेतला.
त्याचाच भाग म्हणून त्यांनी १० मार्च रोजी थेट निवडणूक आयोगाला पत्र पाठवून अजित पवार यांच्या निधनापासून ते आजपर्यंत जो काही पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार झालेला आहे, तो रद्द ठरविण्यात यावा, असे सांगितले. त्यामुळे पक्षांतर्गत सुरू असलेली कुरघोडी उजेडात आली.
या सर्व प्रकारावरून सुनेत्रा पवार नाराज झाल्या. खरे तर ज्याचे खावे मीठ, त्याचे करावे नीट, अशी म्हण आहे. पक्षातील प्रमुख नेते म्हणून अजित पवार यांच्या पश्चात एक जबाबदार नेता म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता, तो दाखविण्याऐवजी संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात कसा येईल, यासाठी अत्यंत घाई-घाईत प्रयत्न केले. परंतु हा डाव लवकरच उलटल्याने एवढी पदे आणि सन्मान मिळूनही संकुचित वृत्तीचे राजकारण केल्याने त्यांची पत गेली आहे. आता पक्षात या प्रकरणावर कितीही पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला तरी या दोन्ही नेत्यांची पत गेल्यात जमा आहे. त्यातच एक अंतर्गत तोडगा म्हणून या दोन्ही नेत्यांना या सर्व प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देण्याची संधीही दिली गेली. त्यानंतर यासंदर्भात स्पष्टीकरणही दिले गेले. परंतु सुनेत्रा पवार यांना या दोन्ही नेत्यांचा अंतस्थ हेतू कळाल्याने त्यांच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही.
उलट त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख न करता पत्र दिले. त्यामुळे पक्षांतर्गत त्यांची काय किंमत राहिली आहे, हे उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या पत्रातूनच लक्षात येते. आज पक्षात सर्व काही आलबेल असल्याचा आव आणला जात असला तरी बड्या नेत्यांचेच बिंग फुटल्याने पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. मात्र, सुनेत्रा पवार वेळीच सावध झाल्याने स्वत:ला बडे नेते म्हणून घेणा-या स्वार्थी नेत्यांचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांनी कितीही खुलासे केले आणि आम्ही नाही त्यातले असे सांगत सुटले तरी पक्ष नेतृत्व आणि जनतेच्या लेखी त्यांची पत धुळीस मिळाली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
मुळात अजित पवार यांचे अपघाती निधन झाले, त्यावेळी संपूर्ण राज्य दु:खात होते. कारण राज्यातला एक असा मोठा नेता गमावला होता, ज्याची नाळ थेट तळागाळापर्यंत पोहोचलेली होती, ज्याला लोकांचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि दु:ख माहीत होते. त्यामुळे या धक्क्यातून महाराष्ट्र सहजासहजी सावरेल, असे वाटत नव्हते. संपूर्ण महाराष्ट्र दु:खात असताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पवार कुटुंबीय पुन्हा एकत्रित येतील, या भीतीने राख सावडण्याच्या कार्यक्रमा दिवशीच राजकीय डाव टाकायला सुरुवात केली. खरे तर पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना या दु:खातून सावरण्यासाठी आणखी काही दिवस जाऊ द्यायला हवे होते. परंतु पवार कुटुंब पुन्हा एक झाल्यास पक्षातील ज्येष्ठ म्हणून आपली पत राहणार की नाही,
या भीतीने पुन्हा महायुतीसोबत जुळवून घेण्याच्या दृष्टीने अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घ्यायला लावला आणि पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांची ताटातूट केली. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पोटात एक आणि ओठात एक असे चित्र पाहायला मिळत होते आणि त्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे, याचीही कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला येत होती. एवढेच काय तर पुढे काय होणार, याचाही अंदाज येऊ लागला होता. परंतु एवढ्या लवकर डाव टाकला जाईल, असे कधीच वाटले नव्हते. परंतु सर्व काही आपल्या ताब्यात ठेवण्याची त्यांना घाई झाली. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वेळीच हा डाव ओळखून त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. एवढेच नव्हे, तर निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात त्यांच्या पदाचा नामोल्लेख टाळून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. एवढेच नव्हे, तर कोणत्याही ज्येष्ठ नेत्याविना त्यांनी दिल्ली दौरा करून पक्षाशी गद्दारी करण्याचा प्रयत्न करणा-या गद्दारांना एक प्रकारे निर्वाणीचा इशारा दिला, असेच म्हणावे लागेल.
-वसिष्ठ घोडके
मोबा. : ८८०५९ ८९५१७

