पंजाब किंग्सची
विजयी घोडदौड
लखनौ : आयपीएल २०२६ मध्ये रविवारी झालेल्या २८ व्या सामन्यात पंजाब किंग्सने ऋषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबने सलग पाचवा विजय नोंदवून गुणतालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने प्लेऑफच्या दिशेने दमदार पाऊल टाकले तर लखनौला सलग तिस-या पराभवाचा धक्का बसला.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्सची सुरुवात वादळी झाली. प्रियांश आर्य आणि कूपर कॉनोली या जोडीने लखनौच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. या दोघांनी मिळून अवघ्या ८० चेंडूंमध्ये १८२ धावांची भागीदारी केली. दोघांनी मिळून १६ षटकार आणि १२ चौकार मारले. त्यांच्या धमाकेदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर पंजाबने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून २५४ धावांचा डोंगर उभा केला. या हंगामातील पंजाबची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

२५५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात अडखळत झाली. त्यानंतर धावगती वाढविण्याच्या नादात लखनौने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. २० ओव्हर्सअखेर लखनौला ५ गडी गमावून केवळ २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे पंजाबचा शानदार विजय झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR