माळी सेवा संघ महाराष्ट्रच्या वतीने लवकरच सन्मान
लातूर : प्रतिनिधी
माळी सेवा संघ महाराष्ट्रच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय माळी समाजरत्न पुरस्कार यंदा पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि लातूर जिल्ह्यातील सुपुत्र मदन वाघमारे यांना जाहीर झाला.
माळी सेवा संघ महाराष्ट्रच्या वतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थी आणि विशेष व्यक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमात माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसोबत प्रगत शेतकरी, आदर्श व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यासोबतच उल्लेखनीय कार्य केलेल्या राज्यातील माळी समाजातील एका समाज बांधवास माळी समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. माळी सेवा संघाच्या वतीने देण्यात येणा-या या मानाच्या पुरस्कारासाठी यावर्षी पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक आणि लातूर जिल्ह्यातील सुपुत्र मदन वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
उद्योजक मदन वाघमारे हे मूळ हाडगा (ता. निलंगा) येथील रहिवासी असून, औद्योगिक प्रशिक्षण घेऊन विविध कंपन्यांत काम करीत याच अनुभव संपन्नतेच्या जोरावर चारचाकी गाडी घेऊन सर्वप्रथम कंपनीतील कामगार सोडण्याचे काम केले आणि अल्पावधीतच स्वत:ची कंपनी स्थापन करून पुण्यात एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्याचवेळी सामाजिक भान ठेवत अनेकांना उदारपणे मदत करण्याचे कामही ते सदैव करतात. त्यांच्या सामाजिक आणि लोकहितकारी कार्याची दखल घेऊन माळी सेवा संघ, महाराष्ट्रच्या वतीने त्यांना यंदाचा माळी समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. लवकरच या सन्मान सोहळ््याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माळी सेवा संघ, महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष पद्माकर वाघमारे व सचिव भारत काळे यांनी दिली.
















