हिंगोली : महिला भाविकांच्या ऑटोला कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे बुधवारच्या रात्री १० वाजेदरम्यान बसने धडक दिली. या अपघातातह्यासमतमधील दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. तर तर तीन महिला भाविक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती कळताच वसमत तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील बाभुळगाव येथील २, वसमत शहरातील २ तसेच नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील १ अशा ५ भाविक महिला अक्कलकोट येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी प्रथम कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथील श्रीदत्त देवस्थानचे दर्शन घेऊन त्या अक्कलकोट येथे दर्शनासाठी येणार होत्या. ९ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथील श्रीदत्त देवस्थानाचे दर्शन घेऊन त्या ऑटोने रेल्वे स्टेशनकडे निघाल्या. याचवेळी त्यांच्या ऑटोला बसने जोरदार धडक दिली.
या अपघातात रुख्मीणीबाई विठल ढोरे(५२,बाभुळगाव), कुसुमताई विठ्ठल जाधव(५२, रा. वसमत) या दोघींचा मृत्यू झाला तर लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर ढोरे (रा. बाभुळगाव), सुलोचना रमेश कळसकर (रा. बुधवारपेठ, वसमत), मालेगाव येथील एक महिला अपघातात जखमी झाल्या. गंभीर जखमींवर गुलबर्गा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच मयताचे व जखमींचे नातेवाईक १० जुलै रोजी सकाळी कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे रवाना झाले आहेत.
वसमत तालुक्यावर शोककळा
गुरु पौर्णिमेनिमित्ताने शहर व परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु तालुक्यातील दोन महिला अपघातात मृत्यू पावल्याचे वृत्त कळताच शहर व तालुक्यात शोककळा पसरली आहे.

