सेलू : येथील एका २० वर्षीय अविवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अनैतिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींना परभणी येथील विशेष न्यायालयात रविवार, दि. १२ जुलै रोजी हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान या तिन्ही आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, सेलू येथील एका २० वर्षीय अविवाहित महिलेसोबत सालगाव त. परतुर येथील गणेश परमेश्वर इंगोले याने अनैतिक संबंध ठेवून व ऐनवेळी लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सेलू पोलिसात ३ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणातील आरोपी गणेश इंगोले याने दि.९ डिसेंबर २०२५ पासून लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा अत्याचार केला. सेलू येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्यानंतर तिच्यासोबत विवाह करण्यास नकार देऊन तू आमच्या जातीची नाहीस असे म्हणून तिची फसवणूक केली होती. याप्रकरणी सेलू पोलिसात दि. ९ जुलै रोजी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती.
याबाबत सेलू पोलिसात गणेश परमेश्वर इंगोले, परमेश्वर बाबासाहेब इंगोले आणि अनिता परमेश्वर इंगोले या तीन आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणातील तीनही आरोपींना आज परभणी येथील विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सर्व प्रकरणाचा तपास सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे हे करत आहेत.
















