Homeपरभणीभीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ ठार

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ ठार

चारठाणा जवळील गणेशपूर शिवारातील घटना

जिंतूर : प्रतिनिधी
जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपुर शिवारात रविवार दि. २२ मार्च रोजी सकाळी भरधाव ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील ४ जागीच ठार झाले असून अन्य २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ५० ते ६० फूट अंतरावर फेकल्या गेलेल्या कारचा चुराडा झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून डिझायर कार (क्र. एमएच १२ जीएफ ६२५९) मंठाकडे जात होती. याचवेळी समोरून येणारी ट्रॅव्हलर (क्र. एमएच २० डीडी ७६६६) ने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यापासून सुमारे ५० ते ६० फूट अंतरावर फेकली जाऊन तिचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात सय्यद अझर सय्यद महेमूद, सुमैया सय्यद अजहर आणि एक लहान बालक जागीच ठार झाले तर सय्यद इस्माईल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या चौघांच्या मृत्यूमुळे वसमत परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, कारमधील मरियम उफाद आणि फरवा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेतील ट्रॅव्हलरमध्ये १३ प्रवासी होते. त्यापैकी ४ ते ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रॅव्हलर चालक संतोष केशवराव शिंदे (४९, रा. छ. संभाजीनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. वाहनांचे पत्रे कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR