पॅरिस : फ्रान्समध्ये उष्णतेने कहर केला असून यात ५८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोकांनी नद्या, तलाव आणि कालव्यांकडे धाव घेतली आहे. यातही मागील काही दिवसांत ४० लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे.
केवळ फ्रान्सच नाही तर युरोपमधील २६ देश उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात आहेत. स्पेन, इटली आणि ब्रिटनसह १४ देशांमध्ये उष्णतेबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापैकी बहुतेक देशांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पोहोचण्याच्या जवळ आहे. उष्णतेच्या लाटेमुळे फ्रान्समधील गोलफेश अणुऊर्जा प्रकल्प बंद करावा लागला. याचे कारण असे की, प्रकल्पाला थंड ठेवण्यासाठी वापरल्या जाणा-या गारोन नदीचे तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भीषण उष्णतेमुळे १३५० हून अधिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
















