धार : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात बदनावर-उज्जैन फोरलेन हायवेवर रविवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातात सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास पंचकवासा गावाजवळ हा अपघात झाला. एका भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने समोरून येणा-या इको व्हॅनला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा अक्षरश: चक्काचूर झाला.
या अपघातात व्हॅनमध्ये प्रवास करणा-या सहाही तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी बदनावर येथील नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व्हॅनमधील सर्व तरुण गुजरातच्या वडोदरा येथील रहिवासी होते. उज्जैन येथे भगवान महाकालचे दर्शन घेऊन ते व्हॅनने गुजरातला परतत होते. त्याच वेळी समोरून राँग साईडने येणा-या ट्रकने त्यांच्या व्हॅनला धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताची माहिती गोळा करून अपघातग्रस्त वाहनं हटवली.
अपघातामुळे महामार्गावर काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच घटनास्थळी स्थानिकांची मोठी गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती. सध्या पोलिस या अपघाताचा सखोल तपास करत आहेत. महाकाल दर्शनानंतर आपल्या घरी वडोदराला परतणा-या या तरुणांवर काळाने घाला घातला. या अपघातामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
















