नवी दिल्ली : मंगळवारी, ४ ऑगस्टला फुकेतहून दिल्लीकडे येणा-या एअर इंडियाच्या विमानाला प्रवासादरम्यान, मोठ्या प्रमाणात टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. या घटनेत विमान अचानक सुमारे ३०० फूट खाली आल्याचे सांगितले जात आहे. विमान दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर १३ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्सना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेच्या चौकशीदरम्यान आता एक नवा आणि गंभीर मुद्दा समोर आला आहे.
विमानाच्या कॅप्टनची प्रवासानंतर करण्यात आलेली ‘सायकोअॅक्टिव्ह सबस्टन्सेस’ म्हणजेच मादक किंवा मनावर परिणाम करणा-या पदार्थांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. या वृत्तामुळे विमानाच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. फुकेतहून दिल्लीच्या दिशेने येणा-या एअर इंडियाच्या एअर बस ए ३२० विमानात १४५ प्रवासी होते. ओडिशाच्या आसपासच्या भागातून विमान जात असताना त्याला अचानक तीव्र टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. टर्ब्युलन्सचा धक्का इतका तीव्र होता की विमान अचानक सुमारे ३०० फूट खाली आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विमानातील काही प्रवासी आणि क्रू मेंबर्स जखमी झाले.
















