कांकेर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला, तर ३ इतर लोक गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-३० वर दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. ही घटना कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंब कांकेर जिल्ह्यातील उडकुडा येथील रहिवासी होते. असे सांगितले जात आहे की, सर्वजण चीवरांज येथील विवाह सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या उडकुडा गावी परतत होते, तेव्हा नाथिया नवागावजवळ त्यांच्या गाडीची दुस-या गाडीला धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की, गाडीतील एकाच कुटुंबातील ३ महिला, २ पुरुष आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुस-या गाडीतील ३ लोक गंभीर जखमी झाले. धडकेमुळे दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
















