तेल अवीव/तेहरान : अमेरिकेने मंगळवारी रात्री सलग चौथ्या दिवशी इराणवर हल्ले केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ७ तास चाललेल्या या मोहिमेत स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या परिसरातील इराणची क्षेपणास्त्र व ड्रोन केंद्रे, नौदलाची मालमत्ता आणि किनारपट्टीवरील संरक्षण यंत्रणांना लक्ष्य करण्यात आले.
दुसरीकडे, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने बहरीन, कुवेत आणि जॉर्डन येथील अमेरिकन लष्करी तळांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केल्याचा दावा केला. तसेच, बहरीनमधील अमेरिकेच्या फिफ्थ फ्लीटचा तळ आणि जॉर्डनमधील अझराक हवाई तळ यांनाही लक्ष्य केल्याचे आयआरजीसीने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला की, तेहरानने करारासाठी पुढाकार घेतला नाही, तर पुढील आठवड्यात वीज प्रकल्प आणि पुलांनाही लक्ष्य केले जाईल. दुसरीकडे, अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबतचे आपले धोरण कायम ठेवणार असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.
इस्रायलचा गाझावर पुन्हा हल्ला
इस्रायलने मध्य गाझामधील दीर अल बलाह या निवासी भागातील एका इमारतीवर मोठा हल्ला केला आहे. इस्रायली हल्ल्यात ३ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. गाझामधील वैद्यकीय सूत्रांनुसार, या हल्ल्यात ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून आजूबाजूच्या परिसराचेही मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांना लक्ष्य करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठीच इस्रायलने हा हल्ला केल्याचा आरोप रुग्णालयातील सूत्रांनी केला आहे. दुसरीकडे, मंगळवारी झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये १० पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. ऑक्टोबरमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम लागू झाल्यापासून आतापर्यंत १ हजार १०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा ताजा हल्ला अशा वेळी झाला आहे. जेव्हा हमासचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘गाझा शांतता योजनेच्या’ दुस-या टप्प्यावर चर्चा करण्यासाठी कैरो येथे गेले आहेत.
समुद्रात भारताशी संबंधित ११ जहाजे अडकली
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताशी संबंधित ११ जहाजे आणि १४८ भारतीय खलाशी सध्या पर्शियन गल्फमध्ये (फारसच्या आखातात) अडकले आहेत. ही सर्व जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची वाट पाहत आहेत.
२०% कराचा निर्णय मागे घेतला
ट्रम्पने होर्मुझमधून जाणा-या जहाजांवर २०% कर लावण्याचा आपला निर्णय मागे घेतला. मध्यपूर्वेतील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
होर्मुझमध्ये जहाजांची सर्वात कमी वाहतूक
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मंगळवारी फक्त ४ जहाजे गेली. १७ जून रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर ही सर्वात कमी जहाज वाहतूक आहे.
















