न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी जागेसाठी भारताने प्रचाराला सुरूवात केली आहे. २०२८ व २०२९ या दोन वर्षांसाठी अस्थायी सदस्याची निवड केली जाणार आहे. जून २०२७ मध्ये अस्थायी जागेसाठी निवडणूक पार पडेल. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळवण्याचे ध्येय कायम आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात १३ जुलै रोजी प्रचार अभियानाला सुरूवात केली. भारताने स्वत:चा ‘शांती’ हा दृष्टीकोन अभियानाच्या केंद्रस्थानी ठेवला.
अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यात युद्ध सुरू असताना भारताने अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच रशिया व युक्रेन यांच्यातील संघर्षही अजून सुरूच आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य १९४५ पासून आतापर्यंत बदललेले नाहीत. त्यामुळे ही परिषद आधुनिक जगतातील आव्हाने झेलण्यास सक्षम आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अस्थायी जागेसाठी जून २०२७ मध्ये निवडणूक होणार आहे. त्यामुळे एकवर्षापूर्वीच भारताने अधिकृतपणे उमेदवारी दाखल केली आहे. यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये भारताला त्याच्या समूहातील इतर देशांकडून पाठिंबा मिळाला होता. परंतु, ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
आशिया – प्रशांत समूहात अस्थायी सदस्यासाठी २०२८ व २०२९ या कार्यकाळासाठी फक्त एकच जागा उपलब्ध आहे. त्यामुळे या जागेसाठी भारत व ताजिकिस्तान यांच्यात थेट निवडणूक होईल. प्रभाव असलेले देशही पराभूत झाल्याचा पॅटर्न मागील काही वर्षांत संयुक्त राष्ट्रसंघाच्या निवडणुकांमध्ये दिसून आला. नुकत्याच झालेल्या यूएन सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत पोर्तुगाल व ऑस्ट्रिया या देशांनी जर्मनीचा पराभव केला. त्यामुळे राजनैतिक प्राबल्य असलेल्या देशही पराभूत होऊ शकतात, असे दिसून आले.
















