अहमदाबाद : पाकिस्तानमधील कराची येथील तुरुंगातून ८० मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे. ते रविवारी रेल्वेने गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचले. दिवाळीनिमित्त त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांना राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथे बसने नेण्यात आले. वृत्तानुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गुरुवारी मच्छिमारांना सोडले आणि दुसऱ्या दिवशी पंजाबमधील अटारी-वाघा सीमेवर राज्य मत्स्य विभागाच्या पथकाकडे सुपूर्द केले.
सुटका करण्यात आलेल्या ८० मच्छिमारांपैकी ५९ गीर सोमनाथ जिल्ह्यातील, १५ देवभूमी द्वारका, दोन जामनगर, एक अमरेली येथील आहे. या सर्वांना २०२० मध्ये पकडण्यात आले होते. सुमारे २०० मच्छीमार अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. या वर्षी मे आणि जूनमध्येही पाकिस्तान सरकारने सुमारे ४०० भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती.