मुंबई : प्रतिनिधी
फलटणमध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येमागे कोण-कोण सहभागी आहे याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. रणजितसिंह निंबाळकरांच्या ५० कोटींच्या बदनामीच्या खटल्याला भीक घालणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, असे जाहीर आव्हान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिले. फलटणमधील पोलिस ठाणे म्हणजे छळछावणी झाले आहे, या आधीही आगवणे बहिणींनी त्यांच्या पत्रात माजी खासदार निंबाळकरांचे नाव अनेकदा घेतले आहे, त्यावर महिला आयोग आणि सरकारने काय कारवाई केली? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.
साता-यातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिला आयोगाने मृत मुलीचे दोन-तीन मुलांशी केलेले चॅट दाखवले. मग चॅट केले म्हणून तिला मारण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी विचारला.
सुषमा अंधारे यांनी या आधीही साता-यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित करत यात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे नाव घेतले होते. त्यानंतर निंबाळकरांच्या वकिलांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुमच्या ५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा.
या प्रकरणात रणजितसिंह निंबाळकरांचा संबंध आहे असे आपण कुठेही म्हटले नाही. पण त्यामध्ये ज्यांची नावे आली आहेत त्यांना चौकशीच्या कक्षेत घ्या अशी मागणी आपण केल्याचे अंधारे म्हणाल्या. तसेच रणजितसिंह निंबाळकरांचे दोन पीए, सहायक पोलिस निरीक्षक जायपात्रे, पीएसआय पाटील, बँक ऑफ इंडिया शाखेचे किरण डुकरे या सगळ्यांची चौकशी करा अशी मागणी अंधारे यांनी केली.
दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल
निंबाळकरांनी फसवण्याचा प्रयत्न केला असा आरोप आगवणेंच्या दोन्ही मुलींनी केला आणि त्यांनी आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला असे सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, अनेक गुन्हे हे रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रभावाने दाखल होतात असा आरोप मी केला होता. या प्रकरणी दोन मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्यावेळी सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतले होते.
अंधारे, आगवणेंवर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. याबद्दल त्यांनी ४८ तासांच्या आत माध्यमांसमोर लेखी माफी मागावी, अन्यथा ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला जाईल अशा आशयाची नोटीस अंधारे आणि आगवणे यांना पाठविली आहे, अशी माहिती अॅड. धीरज घाडगे यांनी दिली. फलटण येथे सोमवारी पत्रकार परिषदेत अॅड. धीरज घाडगे यांच्यासह अॅड. सचिन शिंदे, अॅड. नरसिंह निकम उपस्थित होते.
















