तत्त्व, निष्ठेला तिलांजली महागात!

एकेकाळी तत्त्वाच्या राजकारणाला खूप महत्त्व होते. काहीही झाले तरी तत्वनिष्ठेला कदापि तिलांजली नाही, असाच पक्का निर्धार असायचा. त्यामुळे फोडाफोडीचे, सत्तेला सुरुंग लावण्याचे राजकारण क्वचितच पाहायला मिळायचे. परंतु अलिकडच्या काळात राजकारण हे सोयीने वापरायचे साधन बनले आहे. एका रात्रीत कोण कुठे जाईल आणि कधी निष्ठा बदलेल, याची खात्री राहिलेली नाही. विशेष म्हणजे ज्यांनी अनेक वर्षे तत्त्वाचे राजकारण केले, निष्ठा दाखविली, तीच मंडळी क्षणाचाही विलंब न करता एका पक्षातून दुस-या पक्षात प्रवेश करीत आहे. अनेकजण तर जनतेला गृहीत धरून कोलांटउड्या मारतात. परंतु जनता योग्यवेळ येताच निष्ठा पायदळी तुडवून गद्दारी करणा-यांना चांगलाच धडा शिकविते, याची प्रचिती नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आली. लातूर जिल्ह्यात तर मतदारांनी दिग्गजांना मोठी किंमत मोजण्यास भाग पाडले.

लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५९ जागा आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यामुळे ग्रामीण भागातील राजकारण अक्षरश: ढवळून निघाले. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. लातूर जिल्ह्यात कॉंग्रेसविरुद्ध भाजप अशाच अधिकाधिक लढती रंगल्या. काही ठिकाणी कॉंग्रेसने महाविकास आघाडीसह तर भाजपने महायुतीसह निवडणूक लढविली. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली होती. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचा अंदाज बांधणे कठीण होते. मात्र, ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती. त्यामुळे मतदारांनी योग्य व्यक्तीची निवड करतानाच गुडघ्याला बाशिंग बांधून मिरविणा-या आणि सोयीचे राजकारण करू पाहणा-या गद्दारांना त्यांची जागा दाखविली. विशेषत: ज्यांनी पक्षनिष्ठा सोडली आणि आपली राजकीय सोय पाहून एका पक्षातून दुस-या पक्षात उडी मारली. अशा ब-याच स्वयंघोषित नेत्यांना जनतेने चांगलाच धडा शिकविला. त्यामुळे सोयीचे राजकारण करणा-या नेते, पदाधिका-यांना यातून चांगलाच धडा मिळाला.

यामध्ये औशाचे माजी आमदार दिनकर माने यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक रांगडा आणि निष्ठावान नेता, कट्टर शिवसैनिक म्हणून औसा विधानसभा मतदारसंघातील लोकांनी त्यांच्यावर खूप प्रेम केले. दोनवेळा आमदार केले. तसेच किल्लारी सहकारी कारखाना आणि संत शिरोमणी सहकारी साखर कारखान्याची धुराही त्यांच्यावर सोपविली गेली. त्यांना दोनवेळा मिळालेली आमदारकीची संधी आणि तालुका स्तरावर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नेतृत्व करण्याची सोपविलेली धुरा, हे पाहता त्यांनी तालुक्यात सर्वांच्या विश्वासास पात्र नेता म्हणून आतापर्यंत स्वतंत्र ओळख निर्माण करायला पाहिजे होती. एवढेच नव्हे तर तालुका स्तरावर राजकारण आणि सहकार क्षेत्रात एक स्वतंत्र दबदबा निर्माण करायला पाहिजे होता. कारण काळाची गरज असेल किंवा त्यांच्या नशिबाचा भाग असेल, त्यांना त्या-त्या वेळी चालून संधी आल्या. परंतु त्यांना आजपर्यंत संधीचे सोने कधीच करता आले नाही.

उलट मिळालेल्या संधीचा वैयक्तिक पातळीवर कसा उपयोग करून घेता येईल, याचाच अधिक विचार केला गेला. त्यांनी आपल्यासाठी रात्र-दिवस जिवाचे रान करणा-या कार्यकर्त्यांचाही त्यांनी कधी विचार केला नाही. निवडणुकीत अदृश्य शक्तीच्या बळावर लढायचे आणि त्यानंतर पाच वर्षे गायब व्हायचे, ही त्यांची राजकारणाची पद्धत राहिली आहे. या काळात जे लोक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, आपल्याला साथ दिली, त्यांच्या सुख-दु:खातही कधी सहभाग नाही. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभे राहिलेले कार्यकर्त्यांचे जाळे कधी दुरावले, हे त्यांनाही समजले नाही. तरीही एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीच्या टप्प्यातच त्यांनी भाजपचा आश्रय घेतला. हा सोयीचे राजकारण करण्याचा त्यांचा निर्णय लोकांना पटला नाही. त्यामुळे मतदारसंघात तर त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसलाच. परंतु त्यांचे मूळ गाव असलेल्या आशिवमध्येदेखील जिल्हा परिषदेत स्वत:च्या सुनबाई सदिच्छा माने यांनाही निवडून आणता आले नाही. तेथे कॉंग्रेसच्या नवख्या सईताई गोरे निवडून आल्या. गावक-यांनी आधी ग्रामपंचायतीत आणि आता जिल्हा परिषदेतही मोठा धक्का दिला. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

असाच प्रकार लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे यांच्याबाबतीत झाला आहे. कॉंग्रेस पक्षात निष्ठा दाखवून जिल्हा परिषद सदस्य ते थेट आमदारकीपर्यंत मजल मारली. मुळात हे जे काही मिळाले होते, ते निष्ठेचेच फळ होते. त्यामुळे पक्षनिष्ठा कायम ठेवून आपली महत्त्वाकांक्षा जपली असती तर आणखी ब-याच गोष्टी मिळविता आल्या असत्या. परंतु कोणते ना कोणते कारण पुढे करून आपली निष्ठा बदलण्याचा अनेकदा प्रयत्न केला. यातून त्यांनी विश्वासार्हताही गमावली. त्यामुळे आमदारकीनंतर जी-जी स्वप्ने पाहिली, ती त्यांना कधीच साकारता आली नाहीत. त्यानंतर एक माजी आमदार म्हणून आपले राजकीय वजन वापरून लातूर ग्रामीण मतदारसंघात मोठी उलथापालथ करू शकतो, अशा आविर्भावात आपल्याच पारंपरिक राजकीय शत्रूसोबत निष्ठा दाखविली आणि जिल्हा परिषद निवडणुकीआधी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना कदाचित जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे गाजरही दाखवले असेल. परंतु हे सर्व जनतेच्या हाती असते, याचा त्यांना विसर पडला असेल. त्यांनी आपल्या बंधूच्या पत्नीला कामखेडा गटातून उमेदवारी दिली.

परंतु त्यांना त्यांच्या दुस-या भावजय आशाताई भिसे यांनी खिंडीत गाठले आणि त्यांनी आपल्या जाऊबाई सरिता भिसे यांचा पराभव केला. यासाठी निमित्त आशाताई ठरल्या असल्या तरी निष्ठा बदलल्याने त्याची फार मोठी किंमत त्र्यंबकनानांना मोजावी लागली. हीच बाब कॉंग्रेस पक्षात आपली हयात घालविलेले नाथसिंह देशमुख यांनाही लागू पडते. त्यांनीही वर्षानुवर्षे कॉंग्रेस पक्षाची निष्ठा राखली. पक्षाने त्यांचा सन्मानही केला. विविध ठिकाणी त्यांना संधीही दिली. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने इतरांप्रमाणे त्यांनाही बरीच आश्वासने दिली असतील. त्यामुळे त्यांनीही काटगाव गटातून स्वत:च्या पत्नीला मैदानात उतरविले. या निवडणुकीसाठी त्यांनी आपला अनुभव पणाला लावला. परंतु निष्ठा बदलल्याने त्यांच्या पत्नीचा पराभव करीत त्यांनाही मतदारांनी धडा शिकविला. मुळात कॉंग्रेसचा गड मानल्या जाणा-या लातूर ग्रामीणला सुरुंग कसा लावायचा, याच हेतूने ही नेतेमंडळी भाजपने आपल्या गळाला लावली.

त्यामुळे लातूर ग्रामीण मतदारसंघात आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा होईल, असे वाटायला लागले होते. परंतु मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखविली. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीच्या सरपंच आरती भंडारे या कॉंग्रेसच्या निष्ठावान मानल्या जात होत्या. कारण कॉंग्रेस पक्षामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना भरभरून पाठबळ मिळाले. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी ऐनवेळी त्यांनी निष्ठा बदलली आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळविली. त्यामुळे त्यांनाही आपला सहज विजय होईल, असे वाटत होते. परंतु औराद शहाजानी भागातील मतदारांनी त्यांना धक्का देत कॉंग्रेसच्या एका नवख्या महिला उमेदवाराला निवडून आणत आपल्या सोयीनुसार सत्ता आणि खुर्चीच्या मस्तीत वावरणा-या दिग्गजांना पराभवाची धूळ चारली. एका अर्थाने सोयीनुसार तत्व, निष्ठा सोडाल तर संपून जाल, असाच जणू संदेश या निवडणुकीतून दिला गेला.

  • वसिष्ठ घोडके मोबा. : ८८०५९ ८९५१७

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
47:58
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा होणार; विविध कार्यक्रमांचे आयोजन
02:29
Video thumbnail
Latur Drought|पाच हजारांची मदत देऊन फडणवीस सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा?
09:48
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|जिल्हा बँकेच्या कामांच्या विश्वासावर निवडणूक लढवतोय! धिरज देशमुखांचा दावा
05:15
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47

Latest news