नवी दिल्ली: भारताने गेल्या वर्षी मे २०२५ मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या संघर्षादरम्यान चीनने पाकिस्तानला केवळ शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला नाही, तर त्यांचे तांत्रिक तज्ज्ञ आणि इंजिनीअर्स थेट युद्धभूमीवर पाकिस्तानच्या मदतीसाठी तैनात होते, अशी कबुली चीनने प्रथमच अधिकृतपणे दिली आहे.
चीनची सरकारी वृत्तवाहिनी ‘CCTV’ ला दिलेल्या एका मुलाखतीत, चीनच्या ‘एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन’च्या (AVIC) वरिष्ठ इंजिनीअर्सनी हा खुलासा केला आहे. झांग हेंग या चिनी इंजिनीअरने सांगितले की, मे २०२५ च्या संघर्षावेळी त्यांची टीम पाकिस्तानच्या हवाई तळांवर प्रत्यक्ष हजर होती. ५० अंश सेल्सिअस तापमान आणि सतत वाजत असलेल्या सायरनच्या परिस्थितीत चिनी पथक पाकिस्तानी हवाई दलाला तांत्रिक मदत पुरवत होते.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने मे २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले होते.
या युद्धाच्या वेळी पाकिस्तानने चीनकडून खरेदी केलेली J-10CE ही अत्याधुनिक लढाऊ विमाने वापरली होती. ही विमाने आणि त्यावरील PL-15 क्षेपणास्त्रे युद्धात पूर्ण क्षमतेने चालावीत, यासाठी चिनी तज्ज्ञ पाकिस्तानात तळ ठोकून होते. यापूर्वी चीन केवळ उपग्रहाद्वारे माहिती पुरवत असल्याचा संशय होता, मात्र आता चिनी कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग सिद्ध झाला आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, चीनने या संघर्षाचा वापर आपल्या शस्त्रास्त्रांची ‘लाईव्ह लॅबोरेटरी’ (Live Lab) प्रमाणे चाचणी करण्यासाठी केला. अमेरिकेच्या एका अहवालानुसार, चीनने भारताच्या विरोधात सोशल मीडियावर एआय (AI) जनरेटेड खोटे फोटो पसरवून संभ्रम निर्माण करण्याचाही प्रयत्न केला होता.
“चीनने पहिल्यांदाच युद्धकाळात पाकिस्तानला अशी ऑन-ग्राउंड मदत केल्याचे मान्य केले आहे. भविष्यातील कोणत्याही भारत-पाक संघर्षात भारताला आता चीनच्या या थेट हस्तक्षेपाचा विचार करून रणनीती आखावी लागणार आहे.”

