अलिबाग : प्रतिनिधी
राज्यावर हिंदी लादली जात असल्याचा आरोप वारंवार होत असतानाच आता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हिंदी भाषेतील दिशादर्शक फलकांवरून रायगड जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. महामार्गावर पेण, वडखळ, डोलवी परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उभारलेल्या महाकाय बोर्डांवर थेट हिंदीत सूचना लिहिल्याने रायगडवासीय आक्रमक झाले आहेत. ‘हिंदी बोर्ड हटवा, अन्यथा आंदोलन अटळ,’ असा थेट इशारा शिवसेनेसह विविध सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि मराठीप्रेमींनी दिला आहे.
राज्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे खराब रस्ते, अपूर्ण उड्डाणपूल, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे कोकणवासीय आधीच जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. अशा परिस्थितीत महामार्ग प्राधिकरणाने उभारलेल्या दिशादर्शक फलकांवर ‘गलत दिशा में वाहन ना चलाए’, ‘लेन में वाहन चलाए’ अशा हिंदी भाषेतून सूचना लिहिल्याने मराठीप्रेमींच्या संतापाचा पारा आणखी चढला आहे. आगरी-कोळी संस्कृती आणि मराठी अस्मिता जपणा-या रायगड जिल्ह्यात हिंदी लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
‘हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, यूपी-बिहार नाही,’ अशा शब्दांत शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला. रायगड ही हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे. येथे हिंदी सक्तीचा प्रयत्न केला तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

