नरसी/नांदेड : प्रतिनिधी
नांदेड ते हैदराबाद रस्त्यावरील नरसी चौकात रविवारी सकळी १०.३० ते २ दरम्यान जवळपास ३ तास वाहतूक टप्प झाली होती. वाहतुकीसाठी दुहेरी रस्ता असूनही वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. दरम्यान या वाहतूक कोंडीत आ. राजेश पवारही अडकून पडले होते. दरम्यान पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे वाहनधारकांना वाहतुकीची कोंडी सहन करावी लागत आहे.
नांदेड ते हैदराबाद हा आता महामार्ग झाला आहे. बिदरसाठी सुद्धा याच मागार्चा वापर करावा लागतो. यामुळे येथून दरदरोज हजारो वाहनांची ये-जा होत आहे. परंतू महामार्गावरील नरसी -नायगाव मार्गावर वाहनधारकांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
रविवार दि. १० मे रोजी दुपारी ११ ते २ रविवारी लग्न समारंभाच्या तारखा मोठ्या प्रमाणात होत्या त्यामुळे रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी यावेळी कोणतीच काळजी घेतली नाही, यामुळे जवळपास ३ तास वाहतूक ठप्प झाली होती. सदर वाहतुकीच्या कोंडीचा फटका नायगाव विधानसभेचे आ. राजेश पवार यांनाही बसला. पवार जवळपास २ तास वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडले होते.

