जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. शाखा अभियंता योगेश अहिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. बिल मंजूर करून देण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची मागणी करत अखेर ५ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका मक्तेदाराचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मोठे बिल बाकी होते. हे बिल मंजूर करून रक्कम मिळवून देण्यासाठी संबंधित तक्रारदाराने शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, बिल काढून देण्यासाठी अहिरे यांनी थेट १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला तक्रारदाराला मोठी रक्कम देण्याचा दबाव टाकण्यात आला होता.
तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अधिका-यांनी सापळा रचण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात तडजोडीनंतर ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश अहिरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

