Homeमहाराष्ट्रराज्यात उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’

राज्यात उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’

मुंबईसह अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा वाढणार

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सतत बदलते हवामान पाहायला मिळत आहे. एकीकडे कडक उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे अचानक होणारा अवकाळी पाऊस यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे, तर विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सतत बदलणा-या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना पाहायला मिळत आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव अधिक राहणार आहे. या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण नऊ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अचानक बदलणा-या हवामानामुळे शेतीपिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वादळी वा-यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने शेतक-यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

उर्वरित महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका कायम राहणार आहे. दिवसभर तापमानात चढ-उतार दिसून येण्याची शक्यता असून, सकाळी आणि संध्याकाळी काही प्रमाणात गारवा जाणवू शकतो. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR