जालना : प्रतिनिधी
गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा राज ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. ते सातत्याने राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर जोरदार टीका करत असतात. दरम्यान शनिवारी याविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाल्याची पहायला मिळाली. शनिवारी गुणरत्न सदावर्ते जालन्याच्या दौ-यावर होते, यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर सुपा-या देखील फेकण्यात आल्या. त्यानंतर आता वातावरण चांगलेच तापले असून पोलिसांनी मनसेवर मोठी कारवाई केली आहे.
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि सुपा-या फेकल्या प्रकरणी मनसे पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह तिघांवर चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिस कायदा अंतर्गत रस्ता अडवणे, अवैध पद्धतीने जमाव जमवून घोषणाबाजी करणे, त्याचसोबत जिल्हाधिका-यांनी लागू केलेल्या जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणे अशा विविध प्रकरणांत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

