गोंडा: नॅशनल ओपन रँकिंग कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गोंडा येथे पोहोचलेली स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिला नियमांचा हवाला देत स्पर्धेत उतरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा कुस्ती महासंघ (WFI) आणि कुस्तीपटू यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, विनेशला प्रवेश का नाकारला आणि तिच्यावर कारवाई का करण्यात आली, याची सविस्तर कारणे दिली आहेत.
प्रवेश नाकारण्याचे मुख्य कारण: शिस्तहीनता
पीटीआयशी बोलताना संजय सिंह म्हणाले की, विनेश फोगाटला स्पर्धेच्या ठिकाणी येण्यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. शिस्तभंगाच्या कारवाईमुळे तिला या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, याची कल्पना तिला देण्यात आली होती. तरीही ती गोंडा येथे आली. संजय सिंह यांच्या मते, हा केवळ एक ‘प्रोपेगेंडा’ (प्रचार) करण्याचा प्रयत्न होता. ते पुढे म्हणाले की, “विनेशला आधीच स्पष्ट करण्यात आले होते की तिने नियमांचे उल्लंघन केले आहे. तरीही ती आली, तिने आमची भेट घेतली आणि तिचे म्हणणे मांडले. तिला योग्य ते उत्तर देण्यात आले असून ती शांततेने परतली आहे. तिला सुरक्षेची भीती होती, पण तिने संपूर्ण कॅम्पस फिरून पाहिला आणि तिला पूर्ण सुरक्षा पुरवण्यात आली होती.”
एकाच दिवशी दोन वजन गटांत वजन देणे भोवले
विनेशवर घालण्यात आलेल्या बंदीबाबत (बॅन) स्पष्टीकरण देताना संजय सिंह यांनी एका तांत्रिक नियमाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “कोणताही खेळाडू एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या वजन गटांत आपले वजन देऊ शकत नाही. विनेशने असे केल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. ही कृती पूर्णपणे शिस्तहीनतेच्या कक्षेत येते. याच कारणास्तव तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून तिचा सहभाग नाकारण्यात आला आहे.”
कॅम्पमधील अनुपस्थितीवर कडक भूमिका
विनेश फोगाटने अलीकडेच आरोप केला होता की, १३ कुस्तीपटूंना ९०% उपस्थिती नसल्याच्या कारणावरून बाहेर काढण्यात आले आहे. यावर उत्तर देताना संजय सिंह म्हणाले की, शिस्तीच्या बाबतीत महासंघ कोणतीही तडजोड करणार नाही. “कुस्ती शिबिरांसाठी (कॅम्प) भारत सरकार मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करते. हे जनतेचे पैसे आहेत आणि लोकांच्या भावना या खेळाशी जुडलेल्या आहेत. जर खेळाडू कॅम्पमध्ये उपस्थित न राहता बाहेर जाऊन दंगल (स्थानिक कुस्ती) खेळत असतील, तर त्यांना चाचणी (ट्रायल) मध्ये संधी दिली जाणार नाही. ज्यांची उपस्थिती नसेल, त्यांना पुढे खेळू दिले जाणार नाही या निर्णयावर मी आजही ठाम आहे,” असे सिंह यांनी ठामपणे सांगितले.
राजकारण तापले
विनेश फोगाटच्या पुनरागमनावरून आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी विनेशवर टीका करत म्हटले की, “देवीजी रायता पसरवून गेल्या आहेत.” दुसरीकडे, साक्षी मलिकने विनेशसाठी पुन्हा एकदा ट्रायल घेण्याची मागणी केली आहे, तर काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांनी हे विनेशविरुद्धचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे. सध्या गोंडा येथील स्पर्धेत सुमारे १४०० कुस्तीपटू सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये २५० महिला कुस्तीपटूंचा समावेश आहे. मात्र, विनेश फोगाटच्या प्रवेशबंदीमुळे ही स्पर्धा क्रीडा कौशल्यापेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत राहिली आहे.

