लखनऊ : उत्तर प्रदेशात बुधवारी सायंकाळी आलेल्या भीषण वादळ, पाऊस आणि जोरदार वाऱ्यांनी मोठे नुकसान घडवून आणले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत झाडे उन्मळून पडणे, घरांच्या भिंती कोसळणे आणि विजेचे खांब तुटणे अशा घटनांमध्ये आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक फटका प्रयागराज, भदोही, मिर्झापूर आणि फतेहपूर या जिल्ह्यांना बसला आहे. प्रयागराजमध्ये वादळाने सर्वाधिक हाहाकार माजवला. जिल्ह्यात १६ ते १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळून नागरिक अडकले, तर काही भागांत घरांच्या भिंती पडल्याने कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. हंडिया, फूलपूर, सोरांव आणि मेजा या भागांमध्ये मोठे नुकसान झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.
भदोही जिल्ह्यातही परिस्थिती अत्यंत गंभीर होती. जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे कोसळली आणि काही कच्ची घरे जमीनदोस्त झाली. विविध दुर्घटनांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी महिलांसह लहान मुलांनाही जीव गमवावा लागला. जिल्हा प्रशासनाने बचावकार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिर्झापूरमध्येही वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. झाडे आणि विजेचे खांब पडल्याने वाहतूक आणि वीजपुरवठा विस्कळीत झाला. जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे. फतेहपूरमध्ये भिंती आणि झाडे कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना बाधित क्षेत्रांची पाहणी करून नुकसानीचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. महसूल आणि कृषी विभागाला शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून बाधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळू शकेल. हवामान विभागाने पुढील काही तास उत्तर प्रदेशातील काही भागांत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या प्रशासन युद्धपातळीवर पडलेली झाडे हटवून रस्ते मोकळे करण्याचे आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम करत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील काही तास हवामान अस्थिर राहण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागांत पुन्हा जोरदार वारे आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

