ओस्लो: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे दौऱ्यादरम्यान ओस्लो येथील एका पत्रकार परिषदेत कमालीची खडाजंगी पाहायला मिळाली. नॉर्वेमधील ‘दगसविसेन’ (Dagsavisen) या वृत्तपत्राची महिला पत्रकार हेले लिंग (Helle Lyng) आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) सिबी जॉर्ज यांच्यात झालेल्या या तीख्या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ‘विदेश मंत्रालयाचा सडेतोड रिप्लाय’ म्हणून प्रचंड व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्यात ओस्लो येथे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केले. मात्र, निवेदन संपवून पंतप्रधान मोदी व्यासपीठावरून जात असताना पत्रकार हेले लिंग यांनी त्यांना मोठ्याने ओरडून प्रश्न विचारला, “पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र माध्यमांच्या (Freest Press) प्रश्नांची उत्तरे का देत नाही? आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवावा?”
पंतप्रधान मोदींनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि ते तिथून निघून गेले. परंतु, हा वाद इथेच संपला नाही. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत पुन्हा तोच प्रश्न. यानंतर काही वेळाने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची (MEA) विशेष पत्रकार परिषद सुरू झाली. तिथे याच पत्रकार महिलेने पुन्हा तोच मुद्दा उपस्थित केला. तिने भारतातील माध्यम स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या कथित उल्लंघनाचा हवाला देत थेट प्रश्न केला, “आम्ही भागीदारी मजबूत करत असताना, आम्ही भारतावर विश्वास का ठेवावा? भारतात होणारे मानवाधिकार उल्लंघन थांबवण्याचे आश्वासन तुम्ही देऊ शकता का?”
…आणि सिबी जॉर्ज यांनी दिला १७ मिनिटांचा धडा!
पत्रकार महिलेच्या या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) सिबी जॉर्ज यांनी तब्बल १७ मिनिटांचे सविस्तर आणि सडेतोड उत्तर देत तिला भारतीय लोकशाहीच्या अथांग व्याप्तीची आणि संविधानाची जाणीव करून दिली. सिबी जॉर्ज यांनी प्रामुख्याने खालील मुद्दे मांडले.
अज्ञानी स्वयंसेवी संस्थांचा (NGO) आधार घेऊ नका: सिबी जॉर्ज पत्रकार महिलेला सुनावताना म्हणाले, “जगातील अनेक लोक भारताला चुकीच्या पद्धतीने समजून घेतात. ते कुठल्यातरी अज्ञात आणि अज्ञानी स्वयंसेवी संस्थेचा (NGO) एक-दोन अहवाल वाचतात आणि थेट येऊन भारतावर प्रश्न उपस्थित करतात. लोकांना भारताच्या विशाल व्याप्तीचा अंदाजच नाही.”
भारतीय माध्यमांची ताकद: भारताच्या माध्यम स्वातंत्र्यावर बोलताना ते म्हणाले, “आमच्याकडे रोज संध्याकाळी किती ब्रेकिंग न्यूज असतात याची तुम्हाला कल्पना आहे का? एकट्या दिल्लीतच इंग्रजी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये किमान २०० हून अधिक टीव्ही चॅनल्स कार्यरत आहेत. इतकी मोठी माध्यम यंत्रणा जगात कुठेही नाही.” जगाचा भारतावर विश्वास का? भारताने जागतिक संकटात कशी मदत केली याचे उदाहरण देत जॉर्ज म्हणाले, “कोविड-११ महामारीच्या काळात भारत कोणत्याही गुहेत लपून बसला नव्हता. आम्ही जगातील १०० पेक्षा जास्त देशांना लस आणि १५० हून अधिक देशांना औषधे पुरवली. संकटकाळात जगाच्या पाठीशी उभे राहण्याची हीच भूमिका भारतावर विश्वास ठेवण्यास भाग पाडते.”
लोकशाहीचे जिवंत उदाहरण: मानवाधिकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना जॉर्ज म्हणाले, “आमचे संविधान प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकारांची आणि समानतेची हमी देते. आम्ही १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर महिलांना मतदानाचा अधिकार दिला, जो देण्यासाठी जगातील अनेक विकसित देशांना दशके वाट पाहावी लागली होती. लोकशाही आणि मानवाधिकारांचे सर्वात मोठे उदाहरण काय आहे? तर ‘सरकार बदलण्याचा अधिकार’ आणि ‘गुप्त मतदानाचा अधिकार’. भारतात हेच घडत आले आहे आणि आम्हाला आमच्या लोकशाहीचा सार्थ अभिमान आहे.”
राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर टोला
या संपूर्ण प्रकरणावरून भारतातही राजकारण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. “जेव्हा लपवण्यासारखे काहीच नसते, तेव्हा घाबरण्याची गरज नसते,” असा टोला त्यांनी लगावला आहे. दुसरीकडे, भाजप समर्थकांकडून या महिला पत्रकाराच्या वर्तनावर टीका केली जात असून, भारतीय अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची बाजू अत्यंत कणखरपणे मांडल्याचे कौतुक केले जात आहे.
















