परभणी : पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे प्रस्तावित सिमेंट स्लीपर उत्पादन प्रकल्पाला परिसरातील शेतक-यांनी तीव्र तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे शेती व पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतक-यांनी व्यक्त केली आहे. चुडावा, सोनखेड, मोठी पांढरी, वाई, ढोणे पांगरासह परिसरातील अनेक गावांतील शेतक-यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या सिमेंट स्लीपर उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारी सिमेंटची धूळ, औद्योगिक उत्सर्जन व प्रदूषणामुळे शेजारील शेत जमिनीतील पिके, भाजीपाला व शेती बाधित होण्याची शक्यता आहे. तसेच या भागातील सुपीक कृषी जमिनीचे औद्योगिक वापरासाठी रूपांतर केल्यास शेतक-यांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे
. त्यामुळे संबंधित प्रकल्पास परवानगी देऊ नये व कृषी जमीन वाचवावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकल्पाविरोधात परिसरातील शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी एकत्रित येत आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
















