अयोध्या : राम मंदिरात दान स्वरुपात आलेला पैसा आणि वस्तूंमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या कथित चोरी प्रकरणी सोमवारपासून तपासाला सुरुवात झाली असून देणगीची रक्कम गायब करणे आणि पुरावे नष्ट करणे, असा आरोप असलेल्या व्यक्ती एसआयटी तपासाच्या कक्षेत आहेत. माध्यमांतील काही वृत्तांमध्ये, देणगीतील दोन किलोची सोन्याची गदा आणि कोट्यवधींचे सोने-चांदीचे दागिनेही गायब झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे, मंदिर ट्रस्टच्या पदाधिका-यांच्या जवळच्या व्यक्तींवरही आरोप होत आहेत. त्यांची आर्थिक स्थिती अचानक अनेक पटींनी सुधारली आहे. या सर्वांची सखोल चौकशी होऊ शकते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांनी अद्याप भाष्य केलेले नाही.
या प्रकरणी, बँकेने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या कर्मचा-यांनीच ही चोरी केल्याचा आरोप मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी केला आहे. तसेच ट्रस्टच्या देखरेख टीमचा निष्काळजीपणाही समोर आला आहे. दान मोजणा-या ४४ कर्मचा-यांची चौकशी केली जाऊ शकते. यात ४० बँक आणि एजन्सीचे तर ४-५ ट्रस्टचे लोक आहेत. बाबरी खटल्याचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांनीही निष्पक्ष तपासाणीची मागणी केली आहे.
महत्वाचे म्हणजे, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या जवळच्या, राम शंकर यादव या माजी ड्रायव्हरवर, सर्वात गंभीर आरोप आहेत. त्याची मालमत्ता कोट्यवधींवर पोहोचली आहे. तसेच टिन्नू नावाच्या एका व्यक्तीवर आठ महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा आरोप आहे. मंदिर कर्मचारी लवकुशच्या घरातून २० लाख रुपये मिळाले होते. तर अनुकल्पच्या घरातूनही रोकड मिळाल्याचेही बोलले जात आहे. वित्तीय अधिकार असलेले चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्र यांच्यासह मंदिर व्यवस्था प्रभारी गोपाल राव यांच्यावरही आरोप होत आहेत.
















