नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून दिल्लीत ई-रिक्षा लांबूनच अॅपद्वारे थांबवल्याची प्रकरणे समोर आली आहेत. याबाबत आता केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बॅट बीएमएस, ईपॉच आय आयऑन आणि लॉस आयगी नावाचे हे अॅप्स अॅप स्टोअरमधून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या तीन अॅप्सची माहिती मिळाल्यानंतर ते अॅप स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत, असे सरकारने शुक्रवारी सांगितले. अॅप स्टोअर्सनी सावधगिरी बाळगावी, यावर माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी भर दिला. हानिकारक अॅप्स उपलब्ध होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी सरकार हा मुद्दा त्यांच्याकडे मांडेल, असे ते म्हणाले.
मंत्रालयाकडून दुजोरा मिळाला
या प्रकरणी कारवाईची पुष्टी करताना कृष्णन म्हणाले, हे खरे आहे. काल आमच्या निदर्शनास दोन अॅप्स आले आणि ते दोन्ही अॅप स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत. त्यांनी सीआयआय सायबर सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान ही पुष्टी केली.
नेमके प्रकरण काय?
गुरुवारी बॅट-बीएमएस नावाच्या चिनी स्मार्टफोन अॅपच्या रिमोट शटडाउन फीचरचा वापर करून काही ई-रिक्षा दुरूनच थांबवल्या जात होत्या. त्यावेळी हा मुद्दा उघडकीस आला. या व्हीडीओंमुळे, अशा इंटरनेट-कनेक्टेड वाहन व्यवस्थापन प्रणालींमुळे निर्माण होणा-या सायबरसुरक्षेच्या धोक्यांबद्दल चिंता वाढली आहे.
















