जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील घोणसी येथे गावठाण फिडरचे काम गत अनेक महिन्यापासून रखडले होते. अनेक वेळा महावितरणकडे मागणी करूनही हे काम पूर्ण केले जात नव्हते. यामुळे गावातील लाईट वेळोवेळी बंद पडत होती. यामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले होते . अखेर घोणसी येथील अनिकेत बिरादार यांनी महावितरणच्या पोलवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. यानंतर महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिले व काम करण्यासही सुरुवात केली यानंतर अनिकेत बिरादार यांनी आपले आंदोलन मागे घेतले .
जळकोट तालुक्यातील घोणसी येथे वर्षभरापूर्वी गावठाण फिडर योजनेअंतर्गत स्वतंत्र वीज वाहिनी नळगीर येथील ३३ केवी उपकेंद्रामधून मंजूर झाली होती. यानंतर एका खाजगी ठेकेदारामार्फत काम सुरू झाले मात्र घोणसीच्या पाणीपुरवठा योजनेपर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यापासून हे काम बंद पडले आहे . येथील सरपंच शरद कोकणे यांनी घोणसी येथील स्वतंत्र वीज वाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करावे , पूर्वीची लाईन जीर्ण झाली असून यामुळे गावात वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे, असा पत्रव्यवहार केला परंतु याकडे महावितरणने दुर्लक्षच केले . घोणसी परिसरामधील अनेक गावांमध्ये स्वतंत्र गावठाण फिडर योजना मंजूर झाली व याचे कामही पूर्ण झाले मात्र घोंणशी येथे ही योजना मंजूर होऊन काम पूर्ण होत नव्हते . यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिकेत बिरादार यांनी पोलवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता .
या इशारानुसार दि ३ जुलै रोजी अनिकेत बिरादार हे पोलवर चढले व जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा घेतला . यानंतर घटनास्थळी नळगीर येथील शाखा अभियंता बिरादार व लाईनमॅन उपस्थित झाले . त्यांनी काम लवकर सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले मात्र जोपर्यंत मजूर येणार नाहीत आणि काम सुरू होणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा अनिकेत बिरादार यांनी घेतला. यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली . यानंतर अनिकेत बिरादार यांनी आपले शोले स्टाईल आंदोलन मागे घेतले .















