लातूर : प्रतिनिधी
मुरुड येथे नव्याने मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयास तांदुळजा व चिंचोली मंडळातील गावे जोडण्याबाबत शासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे. मात्र या प्रस्तावास दोन्ही मंडळांतील ग्रामस्थ, ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शविला असून, ग्रामसभांचे ठराव आणि नागरिकांच्या स्वाक्ष-यांसह जिल्हाधिकारी, लातूर तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
तांदुळजा व चिंचोली मंडळातील नागरिकांची महसूल, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, निवासी दाखले, संजय गांधी योजना, आपत्ती पंचनामे, जमीनविषयक प्रकरणे तसेच इतर शासकीय कामे अनेक वर्षांपासून लातूर तहसील कार्यालयामार्फत सुरळीतपणे होत आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रशासकीय व्यवस्था लातूर तहसील कार्यालयाशी सुसंगत झाली आहे. याशिवाय या परिसरातील नागरिकांचे शैक्षणिक, व्यापारी, बँकिंग, आरोग्य व दैनंदिन व्यवहार प्रामुख्याने लातूर शहराशी निगडित असल्याने लातूर तहसील कार्यालयाशी त्यांचा सातत्याने संपर्क राहतो. अशा परिस्थितीत संबंधित गावे मुरुड अप्पर तहसील कार्यालयास जोडल्यास नागरिकांना अनावश्यक प्रशासकीय अडचणी, वेळेचा अपव्यय, आर्थिक भार आणि विविध प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी गैरसोयींना सामोरे जावे लागेल.
निवेदन सादर करताना लातूर पंचायत समितीचे उपसभापती महेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत माने, बाजार समिती संचालक अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य अमोल देडे, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी संतोष स्वामी, जनक गायकवाड तसेच विविध ग्रामपंचायतींचे सरपंच सुहास कदम, प्रताप पाटील, बब्रुवान पवार, महेश हावल, पांडुरंग देशमुख, मनोज करपे, ज्ञानेश्वर बोराडे, चंद्रप्रकाश लाहडे, विलास भिसे, संजय चव्हाण, गणेश सोमासे, बाबासाहेब भिसे, नरेंद्र अल्टे, आकाश नर्सिंगे, सतीश शिंदे यांच्यासह दोन्ही मंडळांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















