मुरुड : वार्ताहर
हरंगुळ- हडपसर ही रेल्वे गाडी मागील दोन वर्षापासून रेल्वे विभागाने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. ती रेल्वे कायमस्वरुपी ठेवण्यात यावी, अशी मागणी रेल्वे संघर्ष समिती मुरुडच्यावतीने खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदरील रेल्वेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. सदरील रेल्वे प्रायोगिक तत्वावर असल्याने तिकिटाचे दर ३० टक्के अधिक आहे. या संदर्भात दि ६ जानेवारी २०२६ रोजी खासदार सुप्रिया सुळे यांना रेल्वे संघर्ष समिती, मुरुडच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. निवेदनाच्या अनुषंगाने खासदार सुप्रिया सुळे यांनी सदरील निवेदन ट्विट केले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डाने खासदार सुळे यांच्या ट्वीटची दखल घेऊन दि १७ मार्च २०२६ रोजी हरंगुळ- हडपसर गाडी कायमस्वरूपी करावी असे परिपत्रक काढले. सदरील परिपत्रक काढून ४ महिने झाले तरी मध्य रेल्वेने सदरील परिपत्रक लागू केलेले नाही. त्यामुळे हरंगुळ- हडपसरसह मध्य रेल्वेच्या ८ रेल्वे गाड्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहेत. हरंगुळ- हडपसर रेल्वे संदर्भात दि १७ मार्च २०२६ परिपत्रक तात्काळ लागू करावे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या ठिकाणी समितीच्या सदस्यानी भेट घेतली. यासंदर्भात संसदेच्या दि २० जुलै २०२६ रोजी पासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनात सदरील विषय मांडू आणि हरंगुळ हडपसर सर्व ८ रेल्वे गाडी कायमस्वरूपी ठेवू असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले.
















