लातूर : प्रतिनिधी
लातूर परिवहन महामंडळाने प्रदुषण मुक्तीचे ध्येय गाठण्यासाठी कंबर कसली आहे. प्रवाशांना वातानुकूलीत आणि आरामदायी प्रवासाच्या सोयी, सुविधा उपलब्ध करुन प्रदुषण मुक्त प्रवास व्हावा, यासाठी ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्यात येत आहे. २१ चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. त्यासाठी ८ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशन उभारणीला आता गती येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’, हे ब्रिद समोर ठेवत प्रवाशांच्या सोयी, सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बदलत्या परिस्थितीनूसार एस. टी. महामंडळाने अनेक बदल यापुर्वीही केले आहेत. महामंडळाच्या वतीने प्रवाशांना विविध सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता ई-बसेस ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावू लागल्या आहेत. या ई-बसेस चार्जिंग करण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून ई-बसेसच्या वापरामुळे प्रदुषण कमी करण्यासाठी मदत होणार आहे.
ई-बसेसमुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होते. तसेच इंधनावरील अवलंबित्व घटून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होते. त्याचबरोबर डिझेलच्या तुलनेत वीज स्वस्त पडते. ई-बसेसची देखभाल, दुरूस्तीचा खर्चही कमी होत असल्याने एस. टी. महामंडळाने आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहील. ई-बसेस जशा प्रदुषणमुक्त आहेत त्याचप्रमाणे त्या ध्वनीप्रदुषण मुक्त आणि अधिक आरामदायी आहेत. त्यामुळे निश्चितच प्रवाशांना अधिक सुखावह प्रवास करता येणार आहे. शासनाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील चार्जिंग स्टेशनसाठी ८ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून २१ ई-बसेस चार्ज करण्याची क्षमता असणा-या २१ चार्जरसह ट्रान्सफॉर्मर, मेन सप्लाय कीट आणि मीटर बसवून संपूर्ण यंत्रणा सज्ज केली जाणार आहे. येणा-या काही दिवसांत हे चार्जिंग पॉईंटस् पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत. त्यामुळे निश्चितच प्रवाशांना आरामदायी आणि प्रदुषणमुक्त प्रवास करता येणार आहे.
















