नागपूर : प्रतिनिधी
विदर्भात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम विदर्भात दिसून येत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नदी-नाले, ओढे आणि धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नागपूर, वर्धा तसेच पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असल्याने शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच नियोजन करावे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतक-यांना मोठा दिलासा
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी शेतातील पिके कोमेजण्याच्या स्थितीत पोहोचली होती. मात्र, सोमवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जमिनीत पुन्हा ओलावा निर्माण झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि इतर खरीप पिकांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात समाधानाचे वातावरण असून वेळेवर झालेला पाऊस पिकांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पूरप्रवण भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
















