हदगाव : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) विशेष मोहिमेत हदगाव येथील श्रीनिवास ऑईल अँड फूड्स या आस्थापनावर धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान २ लाख ४५ हजार ३४० रुपये किमतीचा १ हजार ३६३ लिटर संशयास्पद रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून हदगाव येथील श्रीनिवास ऑईल अँड फूड्स या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिका-यांनी अचानक पाहणी केली. यावेळी तेथे साठवून ठेवलेल्या सोयाबीन तेलाची कागदपत्रे आणि नियमांच्या अनुषंगाने कसून पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान कायदेशीर नियमांचे उल्लंघन व त्रुटी आढळल्याने प्रशासनाने तत्काळ कारवाई करत संपूर्ण तेलसाठा जप्त केला.
या कारवाईमुळे हदगाव परिसरातील खाद्यतेल विक्रेते व व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईत सहभागी अधिकारी छत्रपती संभाजीनगरचे सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या निदेर्शानुसार ही कारवाई पार पडली. यामध्ये सहाय्यक आयुक्त, सु. दा. जिंतुरकर रा. मा. भरकड यांच्यासह सं. वि. कनकावाड, वि. स. लोंढे अ. मा. तम्मडवार, अ. न. गिरी शि. व. श्रीरामे, अ. के. दुधाटे या अधिका-यांनी सहभाग घेतला.
अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. नियमभंग करणा-यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
















