नांदेड : प्रतिनिधी
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेली घरफोडीची घटना उघडकीस आणण्यात यश आले आहे. गुन्हे शोध पथकाने अल्पावधीतच आरोपीस जेरबंद करून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फिर्यादी शेख शिबा तरन्नुम शेख सलीम (रा. आसरा नगर, नांदेड) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला. चोराने घरातून डेल कंपनीचा लॅपटॉप, सोन्याचे गळ्यातील पदक, सोन्याचे कानातील फुल, सोन्याची नथ, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ५५,५०० रूपये किंमतीचा ऐवज लांबवला होता. या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच विमानतळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) लोखंडे व त्यांच्या तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित मोहम्मद आवेज मोहम्मद असगर शेख (वय १९ वर्ष, रा. आसरा नगर, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले.चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याच्याकडून चोरीतील डेल कंपनीचा लॅपटॉप, सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा ४८,५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित मुद्देमालाचा शोध व आरोपीची अधिक चौकशी सुरू आहे. पोलीस निरीक्षक रामदास शेडगे, यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे तसेच पोलीस अंमलदार पाकलवाड, सातारे, आलेवार आणि पत्रे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
















