नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकीकडे बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपला धक्का देत पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या होमग्राऊंडवरच त्यांनी त्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. त्याचवेळी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे एक ट्वीट चांगलंच चर्चेत आले आहे. ‘जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा’, अशा आशयाचे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
नुकतंच झालेल्या दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची ताकद देशाला दिसून आली. आता त्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन राहुल गांधीही मैदानात उतरले आहेत. येत्या ८ ऑगस्ट रोजी राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. रोजगाराच्या मुद्द्यावर ते आंदोलन करणार असून या मध्ये तरुणांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलं. त्याचवेळी ‘जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा’ असा इशारा त्यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारला दिला आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कोटा, देहराडून नंतर आता प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोनल करण्यात येईल. दरवर्षी लाखो युवक परीक्षांचे फॉर्म भरतात, त्याची फी देतात आणि निकालाची वाट पाहतात. पण पेपरफुटीमध्ये त्यांचे नुकसान झाले आहे. थांबलेल्या भरती प्रक्रियेमुळे त्यांच्या भविष्य धोक्यात आले आहे. विद्यार्थी त्यांच्या अधिकारांची मागणी करतात म्हणून दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर पेलेटगनचा हल्ला केला. या प्रश्नावर आम्ही सातत्याने आवाज उठवू आणि विद्यार्थ्यांना न्याय देऊ. जबाबदारी घ्या किंवा सत्ता सोडा असा इशारा त्यांनी दिला.
















