मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र पाठवले असून, पक्षाच्या घटनेमधील दुरुस्त्यांसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतील अनेक बदलांना समर्थन देणारी आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याचा उल्लेख पत्रात केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारिणी बोलावून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मते २६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम १८ (१) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे. तथापि, पक्षाने कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मध्येही बदल केले आहेत. या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आयोगाकडून या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ वैध कागदपत्रे आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने पाठविलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत कलम ६, ७, १२, १८, ३२ आणि ३६ मध्ये बदल करण्यात आले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ कलम १८ संदर्भातील २६ फेब्रुवारी २०२६ च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावांचा समावेश आहे. इतर कलमांसंदर्भातील ठराव आणि बदला संदर्भातील कागदपत्रे जमा करावीत, असे निवडणूक आयोगाने पत्रात म्हटले आहे.
















