मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या (१५ ऑगस्ट) पार्श्वभूमीवर मुंबईत एक अतिशय खळबळजनक आणि गंभीर घटना समोर आली असून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना त्यांच्या अधिकृकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ई-मेलमध्ये केवळ महापौर यांना धमकी देण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ई-मेलमध्ये अत्यंत धक्कादायक आणि प्रक्षोभक मजकूर आहे. धमकी देणा-याने मेलमध्ये खलिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्या असून काही विशिष्ट व्यक्तींची नावेही त्यात नमूद केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी, तुमच्या मुलांना शाळेत पाठवू नका आणि मुंबई मेट्रोने प्रवास करणे टाळा, असा गंभीर इशाराही या ई-मेलद्वारे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महापौर रितू तावडे यांना अशा प्रकारचा धमकीचा ई-मेल येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना दोन वेळा अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या.
पोलिसांची तातडीची कारवाई
या घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली आहेत. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून या ई-मेलचा आयपी अॅड्रेस, मेल पाठवण्याचा स्रोत आणि तो पाठवणारा प्रेषक कोण आहे, याचा कसून शोध घेतला जात आहे. शहरात आधीच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
















