मुंबई : देशाच्या सुरक्षेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणा-या प्रवृत्तींवर महाराष्ट्र सरकारने मोठा प्रहार केला आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासादरम्यान समोर आलेल्या गंभीर माहितीनंतर, राज्य सरकारने दहशतवादाला प्रोत्साहन देणा-या तब्बल ११४ पीडीएफ मासिकांवर बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडून सातत्याने देशविघातक कृत्यांवर आणि संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जाते. एटीएसच्या नुकत्याच झालेल्या सायबर तपास आणि विश्लेषणादरम्यान एक अतिशय धक्कादायक बाब उघडकीस आली होती. इंटरनेट, मेसेजिंग अॅप्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादाला चालना देणारे विविध लेख, प्रक्षोभक पोस्ट्स, ऑडिओ, व्हीडीओ आणि इतर इलेक्ट्रॉनिक व डिजिटल दस्तऐवज जाणीवपूर्वक प्रसारित केले जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या डिजिटल साहित्यामुळे समाजातील तरुणांची माथी भडकवली जाण्याची आणि पर्यायाने देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व व सुरक्षितता धोक्यात येण्याची दाट शक्यता होती.
कोणत्या कायद्यांतर्गत झाली कारवाई?
या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम ९८ उप-कलम (१) अन्वये राज्य सरकारने ६ ऑगस्ट २०२६ रोजी एक विशेष अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेद्वारे दहशतवादास चालना देणा-या एकूण ११४ पीडीएफ मॅगझिन्सवर जप्तीची कारवाई घोषित करण्यात आली आहे.
बंदीचा नेमका अर्थ काय?
या अधिसूचनेनुसार, आता खालीलपैकी कोणतीही कृती करणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल.बंदी घातलेल्या या मासिकांचे कोणत्याही प्रकारे प्रकाशन करणे, ते छापणे किंवा त्यांचे वितरण करणे. मोबाईल, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किंवा इतर कोणत्याही माध्यमातून या पीडीएफ फॉरवर्ड करणे किंवा शेअर करणे. हे साहित्य भौतिक स्वरूपात किंवा डिजिटल (मोबाईल, कॉम्प्युटर, हार्ड डिस्कमध्ये) स्वरूपात स्वत:कडे बाळगणे आणि साठवून ठेवणे. या साहित्याची विक्री करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्याचे प्रदर्शन करणे यांचा समावेश आहे. एटीएसने स्पष्ट इशारा दिला आहे की, या अधिसूचनेचे आणि नियमांचे उल्लंघन करून जर कोणी व्यक्ती हे बंदी घातलेले साहित्य बाळगताना किंवा प्रसारित करताना आढळल्यास, त्याच्याविरुद्ध अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
नागरिकांना एटीएसचे महत्त्वाचे आवाहन
या कारवाईबरोबरच दहशतवादविरोधी पथकाने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही नागरिकाने दहशतवादाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणारे कोणतेही लेख, पोस्ट अथवा दस्तऐवज स्वत:कडे बाळगू नयेत आणि त्यांचा प्रसारही करू नये. तसेच, जर कोणाला असे साहित्य कुठेही आढळले किंवा एखादी व्यक्ती त्याचा प्रसार करत असल्याचे निदर्शनास आले, तर नागरिकांनी एक जबाबदार नागरिक म्हणून त्वरित पोलीस किंवा तपास यंत्रणांना याची माहिती द्यावी. अशी माहिती देणा-या जागरूक नागरिकाचे नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल अशी ग्वाही एटीएसने आपल्या प्रेस नोटमध्ये दिली आहे.
















