राज्यात पावसाने सरासरी गाठली, मराठवाड्यात प्रतीक्षा
मुंबई/छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
यंदाच्या पावसाळ््यावर एल निनोचा प्रभाव असतानाही राज्यात आजपर्यंत ६३७.७ मि.मी. पाऊस झाला. या काळात सरासरी ६२२.७ मि. मी. पाऊस पडतो. त्यामुळे आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. परंतु मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस असून, या भागात अजूनही प्रतीक्षा कायम आहे. जेमतेम पावसावर पेरणी केली. परंतु आता उन्हाची तीव्रता वाढल्याने पिकांची चिंता वाढली आहे.
राज्यात मुंबईसह मुंबई उपनगर, पालघर, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, छ. संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला तर मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, अहिल्यानगर, धुळे, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या भागांत सरासरीइतका पाऊस झाला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात पावसाने उघडीप दिली. या काळात राज्यात सरासरी १०.२ मि. मी. पाऊस पडतो. यंदा ३.६ मि.मी. पाऊस पडला. पहिल्या आठवड्यात ६५ टक्के कमी पाऊस पडला आहे.
वाशिम, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, जालना, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नंदूरबार या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. हिंगोलीत सरासरीच्या तुलनेत ३६ टक्के कमी पाऊस झाला. हिंगोलीत या काळात सरासरी ४६२.२ मि. मी. पाऊस पडतो. यंदा आजवर २९५.५ मि. मी. पाऊस पडला आहे.
राज्यातील धरणांत
पाणीसाठी ७१ टक्के
राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण ३०२९ धरणांमध्ये ७१.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांतील पाणीसाठा ३६८३५.६५ दलघमी इतका असून, एकूण पाणी साठवणूक क्षमता ४८५५३.६४ दलघमी इतकी आहे. विभागनिहाय नागपूरमध्ये ५८.९१ टक्के, छ. संभाजीनगर ४८.६९ टक्के, अमरावती ५८.०३ टक्के, नाशिकमध्ये ७३.५४ टक्के, पुणे विभागात ८४.७८ टक्के, कोकणात ८६.११ टक्के असा एकूण ७१.२३ टक्के पाणासाठा आहे.
पेरण्या ९० टक्क्यांवर
मोसमी हंगामाच्या सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात ब-याच भागांत दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या ९० टक्क्यांवर झाल्या आहेत. खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र १ कोटी ४४ लाख ३६ हजार ५४ हेक्टर आहे. त्यापैकी १ कोटी ३० लाख ५८ हजार ८६८ हेक्टर आहे. संभाजीनगरमध्ये ९१ टक्के, लातूर विभागात ९१ टक्के, अमरावती, ९३ टक्के, नागपूर विभागात ८२ टक्के, कोल्हापूर ९२ टक्के, पुणे विभागात ९३ टक्के, नाशिकमध्ये ९५ टक्के, कोकणात ६९ टक्के पेरण्या झाल्या.
















