नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अद्याप संपलेले दिसत नाही. याचा थेट परिणाम होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणा-या तेलवाहू तसेच व्यापारी जहाजांवर झालेला पाहायला मिळत आहे. यातच भारत ते रशिया या दोन देशांदरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू करण्याचा मानस रशियाकडून बोलून दाखवण्यात आला आहे. याबाबत भारताला खास प्रस्ताव देण्यात आला असून याचा मार्ग कसा असेल, यासंदर्भातही काही आरेखन करण्यात आले आहे.
रशिया भविष्यात हिंद महासागरापर्यंत भूमार्ग उपलब्ध करून देणारा आणि त्याला भारताशी जोडणारा रेल्वेमार्ग बांधण्याच्या शक्यतेचा शोध घेत आहे. रशियाचे उपपंतप्रधान मरात खुसनुलिन यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आहे. रशियन वृत्तसंस्था ळअरर ला दिलेल्या मुलाखतीत खुसनुलिन म्हणाले की, बोस्फोरस आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीसह महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मॉस्कोने पर्यायी वाहतूक मार्गांचा शोध घेतला पाहिजे.
खुसनुलिन यांच्या मते, तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमार्गे रशिया ते भारत असा रेल्वे कॉरिडॉर हा एक संभाव्य पर्याय असू शकतो. भारतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध करून देणा-या कोणत्याही मार्गाचा रशिया विचार करेल, असे ते म्हणाले. हा प्रस्ताव अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे. या प्रस्तावित योजनेअंतर्गत कोणताही रेल्वे मार्ग, प्रवासी रेल्वे सेवा, तिकीट दर किंवा सुरू होण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असे सांगण्यात आले आहे.
पर्यायी भू-वाहतूक मार्ग शोधण्याची गरज
खुसनुलिन यांनी पर्यायी मार्ग विकसित करण्याच्या सामरिक महत्त्वावर भर दिला. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक आहे. जागतिक तेल व्यापारापैकी अंदाजे २५ टक्के आणि एलएनजीच्या वाहतुकीपैकी सुमारे २० टक्के वाहतूक या मार्गातून होते. रशियाचे उपपंतप्रधान म्हणाले की, बोस्फोरस आणि होर्मुझ सामुद्रधुनीबद्दलच्या चिंतेमुळे पर्यायी भू-वाहतूक मार्ग शोधण्याची गरज अधोरेखित होते. भारताशी रेल्वे जोडणी झाल्यास रशियाला केवळ सागरी वाहतुकीवर अवलंबून न राहता हिंद महासागराकडे मालवाहतूक करण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होऊ शकतो. यामुळे रशियाची मध्य आणि दक्षिण आशियासोबतची भू-जोडणी देखील मजबूत होऊ शकते. भारतासाठी अशा कॉरिडॉरमुळे रशिया आणि मध्य आशियाई देशांशी संपर्क साधण्याच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात.
प्रस्ताव महत्त्वपूर्ण
रशिया आणि भारत थेट भूमार्गाच्या पर्यायाचा विचार करत असल्याने हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण मानला जातो. या मार्गात अनेक देशांचा समावेश असेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विकास, तसेच वाहतूक, सुरक्षा समन्वयाची आवश्यकता असेल. हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणा-या सागरी व्यापारात व्यत्यय येत आहे.
















